ठाणे, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:
आश्रम शाळेतील मुलांचे केस कापण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीकडून 22 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. शाळेचे मुख्याध्यापक किशोर रोहिदास पाटील (49) आणि अधीक्षक दिलीप लक्ष्मण खोटरे (38) अशी लाचप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सवरोली, शहापूर येथे आदिवासी आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलांचे केस कापण्याच्या कामाचे कंत्राट तक्रारदार यांना देण्यात आले आहे. तक्रारदाराला त्यांच्या कामाचे पैसे मिळाले होते. मात्र कंत्राट पुढे सुरूच ठेवण्यासाठी मुख्याध्यापक किशोर रोहिदास पाटील आणि अधीक्षक दिलीप लक्ष्मण खोटरे यांनी तक्रारदाराकडे 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे कंत्राटदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केल्यानंतर आश्रम शाळेतील कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार आज तक्रारदाराकडून 22 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक किशोर रोहिदास पाटील आणि अधीक्षक दिलीप लक्ष्मण खोटरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.