आरटीई प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला
नवी मुंबई, 10 एप्रिल 2017/AV News Bureau:
आरटीई २५% टक्के प्रवेश यादीत नावे येऊन देखील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या नेरूळ येथील एमजीएम शाळा प्रशासनाला मनसेने घेराव घातला. मनसेच्या या दणक्यामुळे शाळा प्रशासनाने नमते घेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीया अवघ्या दोन तासांत पूर्ण केली.
२४ मार्च २०१७ पासून RTE अंतर्गत दुसऱ्या प्रवेश यादीत नाव येऊन ही नेरूळ येथील एमजीएम शाळेने विद्यार्थ्यांना नर्सरी ला प्रवेश देण्यास पालकांना स्पष्ट नकार दिला होता. याचसंदर्भात तक्रारी आल्यांनतर मागील आठवड्यात महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला मान्यता रद्द करू अशी नोटीस दिली होती. मात्र तरीही शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नव्हता. अखेर ८ एप्रिल रोजी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली, पालकांच्या उपस्थितीत, मनसेने एमजीएम शाळा प्रशासनाला घेराव घातला व त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली. केंद्र समन्वयक आत्माराम मिरकुटे व शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे मान्य केले.
मनसेच्या शिष्टमंडळात विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, रोजगार विभागाचे अप्पासाहेब कोठुळे, विभाग अध्यक्ष सचिन कदम, अभिजित देसाई, उपविभाग अध्यक्ष शिवम कवडे, शाखा अध्यक्ष विराट शृंगारे, सागर नाईकरे, सागर घोडेकर, विनायक पिंगळे, मंदार घरत व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.