ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय
ठाणे,7 एप्रिल 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिकेच्या मल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी आग विझविण्यासाठी, शहरातील विविध उद्याने तसेच रस्ते दुभाजकांमधील हरित पट्टे यासाठी वापरण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील मल प्रक्रिया केंद्रामध्ये एकूण ४० दश लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते तर मुंब्रा येथील मल प्रक्रिया केंद्रामध्ये ७ ते ८ दश लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. सद्यस्थितीत या पाण्याचा वापर होत नसल्याने हे पाणी खाडीला सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी प्रक्रिया केलेले पाणी यापुढे उद्यानासाठी, रस्ते दुभाजकमधील हरित पट्टे, आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या वाहनांमध्ये तसेच विकासकांनी त्यांच्या आग प्रतिबंधक यंत्रणेसाठी वापरावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले.