2 लाख शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणार

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई, 7 एप्रिल 2017/AV News Bureau:

गेल्या 2 वर्षात 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज कनेक्शन दिले आहे. त्यांनतर मागणीनुसार पुन्हा नवीन 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज कनेक्शन देण्यात येणार असून त्यासाठी तीन हजार कोटी रुपये लागणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली.

आ. सुजितसिंग ठाकूर व अन्य विधान सदस्यांनी नियम 260 अन्वये विचारलेल्या प्रस्तावाच्या उत्तरात ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्च 2018 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणार आहोत. तसेच 17 हजार कोटींची थकबाकी असूनही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

  • 19 लाख परिवारांना वीज नाही

शेतकऱ्यांना 12 तास दिवसा अखंडीत वीज मिळावी म्हणून सोलर कृषी फिडरची योजना तयार होत आहे. आधी या योजनेसाठी 52 कोटी खर्च होणार होता. तो प्रस्ताव आता 8 ते 10 कोटीत होणार आहे. लाइनमनच्या सर्व जागा भरण्यासाठी एक ग्रामपंचायत एक विद्युत व्यवस्थापक ही संकल्पना आणली आहे. आजही राज्यातील 19 लाख परिवारांना वीज मिळत नाही. आदिवासी भागात 100 टक्के लोकांना वीज पुरवठा करण्यासाठी 1400 कोटी खर्च लागणार आहे. हा सर्व खर्च करण्यासाठी वसूली होण्याची गरज आहे. त्याशिवाय हा कारभार चालणार नाही, असे ही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.