ठाणे, 6 एप्रिल 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने उद्यापासून पुन्हा रस्ता रूंदीकरणाची कारवाई सुरू होणार आहे. नुरीबाबा दर्गा रोड, समतानगर रोड नं. ३३, आर मॉलच्या मागील रस्ता आणि मुंब्रा आदी पाच ठिकाणी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत रस्तारूंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणादरम्यान डांबरीकरण करण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
या कारवाईमध्ये जे रहिवाशी बाधित होणार आहेत, त्यांना रेंटल हाउसिंगमध्ये सदनिका देण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
उद्या सकाळी ठिक ९ वाजता सुरू होणा-या रस्ता रूंदीकरण कारवाईमध्ये उपनगर अभियंता राजन खांडपेकर, सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या यांच्या पथकाद्वारे नुरी बाबा दर्गा रोड, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या पथकाद्वारे समतानगर रोड नं. ३३, संजय निपाणेयांच्या पथकाद्वारे आर मॉल, घोडबंदर रोड मागील बिगर निवासी बांधकामे निष्काषित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तर मुंब्रा येथे भारत गियर, तन्वर नगर, वाय जंक्शन ते कल्याण फाटा या ठिकाणी उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्यापथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, आर मॉल येथील निवासी बांधकामे, हरदास नगर, शास्त्रीनगर, कळवा, बाळकुम येथील राम मारूती रोड आणि कळवा ते खारीगाव या रस्त्यांच्या रूंदीकरणाचे स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्तांची भेट घेवून सदरची कारवाई १५ एप्रिल नंतर सुरू करण्याची विनंती केल्यामुळे ही कारवाई आता १५ एप्रिल रोजी करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी यावेळी दिल्या.