खा.गायकवाडप्रकरणी शिवसेना खासदारांचा इशारा
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2017:
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा मुद्दा पुढे करीत शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरच बंदी घालण्याचा विमान कंपन्यांचा मुद्दा आज लोकसभेत चांगलाच गाजला. विमान कंपन्यांनी खा. गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनी दिला आहे.
23 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना जागेच्या मुद्द्यावरून खा. रवींद्र गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता. या वादातून रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी खा. गायकवाड यांच्या विमान प्रवासाला बंदी घातली आहे. यामुळे शिवसेनेचे सर्वच खासदार आक्रमक झाले आहेत. आज लोकसभेत खा. गायकवाड यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडताना आपल्याशी असभ्य वर्तन केल्यामुळेच आपण संतापल्याचे सांगितले. तसेच आपल्या वर्तनाबाबत संसदेत माफी मागितली. मात्र एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची माफी मागण्यास नकार दिला. तसेच आपल्याविरोधात दिल्ली पोलिसांनी नोंदविलेला 308 अंतर्गतचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी गायकवाड यांनी दिली.
याप्रकरणी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी सांगितले की, गायकवाड प्रकरणात कायदा आपले काम करील. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राजू यांनी सांगितले.
हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उत्तरानंतर शिवसेना खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी हवाई वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. खासदार गायकवाड यांच्यावरील विमान बंदी तातडीने हटवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही,असा इशारा शिवसेनेच्या खासदारांना दिला आहे.