मुंबई, 5 एप्रिल 2017/AV News Bureau:
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल, अभिनेते अनुपम खेर, सीबीएफसीचे माजी अध्यक्ष रमेश सिप्पी, रविना टंडन, सोनू सुद, प्रितीश नंदी, मनमोहन शेट्टी, गजेंद्र चौहान, किरण शांताराम, मुकेश शर्मा आणि चित्रपट क्षेत्रातील इतर मान्यवर तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
1950 पासून मुंबईतील वाळकेश्वर येथील व्हाईट हाऊस संकुलातील भारत-भवन येथून सी.बी.एफ.सी.चे काम सुरु होते. मात्र कामाची व्याप्ती वाढल्यामुळे या कार्यालयाला जागेच्या कमतरतेचा प्रश्न भेडसावत होता. मुंबई हे मराठी, हिंदी, भोजपुरी, आणि पंजाबी चित्रपट निर्मिती केंद्र असून, प्रमाणनाचे सुमारे 60 टक्के काम सी.बी.एफ.सी.कडे होते. 2015-16 मध्ये सी.बी.एफ.सी.ने विविध लांबीच्या सुमारे 11 हजार चित्रपटांना प्रमाणपत्र दिले आहे. यामध्ये 787 फिचर फिल्म आणि 690 परदेशी चित्रपटांचा समावेश होता.
जागेची समस्या, अभ्यागतांसाठी वाहनतळाच्या सुविधेची कमतरता, आदी गोष्टी लक्षात घेऊन आधुनिक आणि डिजिटल सुविधेने युक्त कार्यालासाठी फिल्म्स डिव्हिजनमधील जागा देण्यात यावी, यासाठी सी.बी.एफ.सी.ने एक प्रस्ताव दिला होता. गेल्याच आठवड्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सी.बी.एफ.सी.च्या ऑनलाईन चित्रपट प्रमाणन योजनेचे उद्घाटन केले.
- नवीन कार्यालयाविषयी
प्रसार भारतीच्या बांधकाम विभागाने या नवीन कार्यालयाचे नुतनीकरण केले आहे. यामध्ये अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई विभागीय कार्यालय यासाठीची चेम्बर्स आहेत. नवीन कार्यालयातील आधुनिक सुविधांमुळे आता सी.बी.एफ.सी. आपल्याकडील प्रिव्ह्यू सुविधेशिवाय फिल्म्स डिव्हिजन मधील प्रिव्ह्यू थिएटर्सचाही वापर करू शकतील. तसेच चित्रपट प्रमाणनांचे काम सुद्धा जलद गतीने होणार आहे.