उद्योगपतींची कर्ज माफ, शेतक-यांची का नाही ? 

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

सोलापूर/ पुणे,3 एप्रिल 2017/AV News Bureau:

सरकार देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींची कर्ज माफ करू शकते, मग अडचणीत असलेल्या शेतक-यांची ३० हजार कोटींची कर्ज माफ का करत नाही ? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी आज सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर,  इंदापूर या ठिकाणी शेतक-यांशी संवाद साधला. त्यानंतर सभेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर  टीका केली.

भाजप सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असून निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा प्रश्न चव्हाण यांनी सरकारला केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले की,  शेतक-यांचा कुठला पक्ष नाही, शेती हाच त्याचा पक्ष आहे म्हणून त्याची कर्जमाफी झाली पाहीजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार  निवडणूका आल्या की आश्वासनाचे गाजर दाखविण्याशिवाय काही करत नाही. ही शेतकरी समाजाच्या अस्तित्वाची लढाई असून शेतकरी पेटून उठला तर सरकार जळून खाक होईल.

पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी, शेकाप नेते प्रविण गायकवाड यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पश्चिम  महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण करून संघर्ष यात्रा उद्या कोकणात दाखल होणार आहे.