सावित्री नदीवरील नवीन पूल जूनपर्यंत पूर्ण करणार

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई, 3 एप्रिल 2017/AV News Bureau:

महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील वाहून गेलेल्या पूलाला पर्याय म्हणून नव्याने बांधण्यात येणाऱ्या पूलाचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

शरद रणपिसे, धनंजय मुंडे, जयंतराव जाधव आणि अन्य सदस्यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 37 जणांचा मृत्यू झाला होता. वाहून गेलेल्या या पूलाला पर्याय म्हणून 239 मीटर लांबीचा नवीन तीन पदरी पूल बांधण्यात येत आहे. या पूलाचे बांधकाम जून 2017 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या नवीन पूलाच्या उभारणीसाठी सुमारे 35.77 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. या कामासाठी 2016-17 मध्ये 21.46 कोटी आणि 2017-18 मध्ये 14.30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन पूलाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे, असे पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.