नवी दिल्ली, 3 एप्रिल 2017:
देशातला सर्वात लांब 9.2 कि.मी.चा जम्मू-काश्मीरमधील चेनानी-नाशरी बोगदा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केला.
जागतिक दर्जाचा हा बोगदा असून तो बांधताना पर्यावरणाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. जगातल्या पर्यावरणवाद्यांसाठी हा बोगदा म्हणजे नैसर्गिक रक्षण करुन विकासकाम करण्याचे उत्तम उदाहण आहे, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले. भरकटलेले काही युवक काश्मिरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दगड हातात घेतात मात्र जम्मू-काश्मिरच्या युवकांनी दगडातून हा बोगदा आपल्या श्रमाने साकार करत आम्हाला विकासाचा मार्ग हवा आहे, असा संदेश दिला आहे. या बोगद्यामुळे काश्मिरच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असून यामुळे आर्थिक विकासाला मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंसा आणि दहशतवाद यातून काहीही साध्य होणार नाही. केंद्राकडून मिळालेला विकास निधी उत्तम कामावर खर्च केल्याबद्दल त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे आभार मानलेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचार कार्याला उजाळा देतांना मोदी यांनी “काश्मिरीयत, इन्सानियत, जमूरीयत” हा मंत्र त्यांनी दिला होता. त्याच मंत्रानुसार केंद्र सरकार काम करत आहे. काश्मिरचा विकास करण्यासाठी आम्हाला जनतेच्या सहभागाची गरज आहे,असे पंतप्रधान म्हणाले.