काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांची टीका
लातूर/उस्मानाबाद,3 एप्रिल 2017/AV News Bureau:
राज्यातल्या सरकारला संवेदना राहिल्या नसून रोज शेतकरी मरत असताना सरकार ढिम्म बसले आहे. भाजप शिवसेना सरकारचा कारभार निझाम राजवटीपेक्षाही वाईट असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
संघर्ष यात्रेच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधला. त्यावेळी आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.
सरकारच्या धोरणांमुळे राज्यातला शेतकरी उध्द्वस्त झाला आहे. शेतक-यांना संपावर जाण्याची दुर्देवी वेळ या सरकारने आणली आहे. हे सरकारचे अपयश असून आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हाच तातडीचा उपाय असून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून एकत्र आलेले सर्व विरोधक एकत्र राहून शेतक-यांना कर्जमाफी मिळवून दिल्याशिवाय हा संघर्ष थांबवणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतक-याला बळ देण्यासाठी संघर्ष यात्रा काढली आहे. मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादमध्ये येऊन पॅकेजची घोषणा केली होती पण सरकारने यातला एक रूपयाही अद्याप दिला नाही, असे विखे पाटील म्हणाले.
लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजपला सत्ता दिली, मात्र भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. लोकांना खोटी आश्वासने देऊन भाजपने लोकांचा विश्वासघात केला आहे. या शेतकरीविरोधी सरकारला जागा दाखवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले असून शेतक-यांनी साथ दिल्यावर सरकार बदलायला फार वेळ लागणार नाही असे पवार म्हणाले.