ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई होणार

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

ठाणे, 3 एप्रिल 2017/AV News Bureau:

ठाणे शहरातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर  नियंत्रण ठेवण्यासाठी त्या त्या परिमंडळ उप आयुक्तांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका स्तरावर कडक कारवाई करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या.

घोषणा फलक, जाहिरात, पोस्टर्स, होर्डींगसाठी परवानगी देताना परवानगीचा क्रमांक, परवानगीचा कालावधी, ठिकाण इत्यादी बाबी ठळकपणे दिसतील अशा प्रकारे जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्सवर छापण्यात याव्यात आणि ज्या जाहिरातींवर या बाबी छापल्या नसतील ते जाहिरात फलक तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी व त्याचे छायाचित्र संबंधित पोलीस स्टेशनला पाठवण्यात यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे नेत्यांचे वाढदिवस किंवा धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी अनधिकृतपणे लावण्यात येणा-या जाहिराती, घोषणा फलक, होर्डींग, पोस्टर्स हे कार्यक्रम होण्याच्या आधीच काढून टाकावेत, उत्सव काळात मंडप, बूथ यांना परवानगी देताना मंडप परिसरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डींग, पोस्टर्स लावण्यात येवू नये अशी अट घालण्यात यावी अशा सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

  • कळवा, मुंब्रा प्रभाग समितीसाठी परिमंडळ 1 चे उपायुक्त यांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रभागातील तक्रारीसाठी 022-25410470.
  • नौपाडा, कोपरी, रायलादेवी,वागळे प्रभाग समितीसाठी परिमंडळ2 चे उपायुक्त यांची नियुक्ती केली असून त्या प्रभागातील तक्रारीसाठी 022-25429645 .
  • लोकमान्यनगर सावरकर, वर्तकनगर, उथळसर,माजिवडा प्रभागासाठी परिमंडळ 3 चे उपायुक्त यांची नियुक्ती केली असून या प्रभागातील तक्रारीसाठी 022-25447220, 022-25402375 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.