संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांची माहिती
मुंबई, 31 मार्च 2017 /AV News Bureau:
विधानसभेतील 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेतील सदस्यांच्या निलंबनावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिले होते. त्यामुळे सरकारकडून किती आमदारांचे निलंबन मागे घेतले जाते याकडे विरोधकांचे लक्ष लागले होते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली होती. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, हास्य विनोद करणे ,सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, विधानभवन आवारात अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून विरोधी पक्षांच्या १९ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र विरोधकांनी यावरून सरकारला धारवेर धरत कामकाकाजात सहभागी न होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आमदारांच्या निलंबनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती बापट यांनी दिली.
- निलंबन मागे घेण्यात आलेले विधानसभेतील आमदार पुढीलप्रमाणे –
संग्राम थोपटे, दीपक चव्हाण, दत्तात्रय भरणे, अवधूत तटकरे, अमित झनक, वैभव पिचड, डी. पी. सावंत, नरहरी झिरवाळ आणि अब्दुल सत्तार