माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
जालना / औरंगाबाद, 1 एप्रिल 2017/AV News Bureau:
राज्यात ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या करूनही सरकारला कर्जमाफी देता येता नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी, आम्ही कर्जमाफी करून दाखवतो,असे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिले आहे.
विरोधी पक्षाच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवशी आज मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद येथे विराट सभेत बोलताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. शेतक-यांच्या समस्यांची जाण नसलेले लोक सत्तेत आहेत. त्यामुळे ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्यानंतरही मुख्यमंत्री कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आली नाही असे म्हणतात. या सरकारने शेतकरी उध्वस्त केला असून सरकार विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करावा लागणार आहे. जनतेची फसवणूक करणा-या सरकारच्या मंत्र्यांना गावबंदी करा असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविण गायकवाड यांनीही सरकारवर टीका केली.