मुंबई, 1 एप्रिल 2017/AV News Bureau:
सायन-पनवेल महामार्गावरील वाहनांची वाढत्या रहदारीमुळे सध्याच्या पुलावर येणारा भार आणि होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाशी खाडीवर तिसरा नवीन पूल उभारण्याबाबत राज्य सरकार विचार करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
शरद रणपिसे यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिंदे यांनी लेखी उत्तर दिले.ठाणे खाडीवर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 30 नोव्हेंबर 2015 रोजी घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. या पूलाबाबतचा सविस्तर अहवाल महामंडळामार्फत पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 775 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा खर्च भागविण्यासाठी प्रकल्पाचे बांधकाम इपीसी तत्वावर पूर्ण करण्यासाठी कर्ज रोखे उभारून निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे.