बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा

दोन आठवड्यात भूमीपुजन करणार, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार

मुंबई, 1 एप्रिल 2017/AV News Bureau:

बीडीडी चाळीतील पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला असून पुढील दोन आठवड्यांत भुमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत करण्यात आली.  या चाळींच्या पुर्नविकासात तेथे राहणाऱ्या रहिवाशांना ५०० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे मोडकळीस आलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा नियम २९३ अन्वये गृहनिर्माणासंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर आमदारांनी  आपल्या विभागातील समस्यांवर प्रश्‍न उपस्थित केले.

मुंबईमध्ये वरळी, ना.म.जोशी मार्ग, नायगाव या ठिकाणी राज्य शासनाच्या जागेवर व शिवडी येथे मुंबई बंदर न्यासाच्या जागेवर अशा एकुण ९२.७० एकरवर २०८ चाळी आहेत. वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ, नायगाव येथील चाळीतील प्रत्येक इमारतीमध्ये ८० रहिवाशी गाळे प्रत्येकी १६० चौरस फूट चटई क्षेत्रफळ  याप्रमाणे एकूण १६हजार २०३ गाळे आहेत. बीडीडी चाळींच्या पुर्नविकासासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची सुकाणु अभिकरण (नोडल एजन्सी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ना.म.जोशी मार्ग येथी चाळीच्या पुर्नविकासासाठी शापुरजी पालनजी व नायगांव येथील चाळीच्या पुर्नविकासासाठी लार्सन ऍन्ड टुब्रो या कंत्रादारांची निवड करण्यात आली आहे. तसेच वरळी येथील चाळींच्या पुनर्विकास निविदा स्तरावर असल्याची माहिती गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण  राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. या प्रकल्पातून १३,६०० अतिरिक्त सदनिका निर्माण होणार असल्याचेही वायकर यांनी सांगितले.