राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, ३० मार्च 2017/AV News Bureau:
राज्यभरात अनेक ठिकाणी देवी देवता, महापुरुष आणि गड किल्ल्यांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली
राज्यात अनेक ठिकाणी बियरबार, परमिट रुम, मांसाहारी खानावळ, लोकनाट्य कला केंद्र तसेच देशी दारू विक्री केंद्रांना महापुरुष, देवदेवता आणि गड किल्ल्यांच्या नावाचा गैरवापर केला जात, अशी लक्षवेधी अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केली होती.
त्यावर बावनकुळे यांनी सांगितले की, देवी देवता व थोर महापुरुषांच्या नावाचा वापर करणे हे चुकीचे आहे. सध्या याबाबत कोणत्याप्रकारचा कायदा अस्तित्वात नाही. मात्र असे असले तरी कामगार विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळून हा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे, बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य भाई गिरकर, नीलम गोहे, रामहरी रुपनवर यांनी सहभाग घेतला.