25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाचा दावा
नवी मुंबई, 31 मार्च 201 /AV News Bureau:
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% मोफत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रथम फेरीत ठाणे जिल्ह्यामधून सर्वाधिक 1102 प्रवेश निश्चित झालेले आहेत. शिक्षणविभागाने कारवाई करण्याचा इशारा दिल्यामुळेच शाळा व्यवस्थापनांनी गरजू मुलांना प्रवेश देण्यास सुरुवात केल्याची माहिती नवी मुंबई शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दिली. त्यामुळे श्रेयासाठी चढाओढ करणाऱ्यांचा हिरमोढ झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने 25% प्रवेश प्रकिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची 21 ते 24 जानेवारी 2017 याकालावधीत कार्यशाळा घेऊन शाळा नोंदणी व प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना 25 टक्के प्रवेशाबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पालकांच्या तक्रारी आल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. शिक्षण विभागाच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे वरमलेल्या खासगी शाळा व्यवस्थापनांनी 25 टक्के प्रवेश देण्यास सुरुवात केल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली.
पालकांना प्रवेशाबाबत माहिती होण्यासाठी वेळोवेळी विविध भाष्यांच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच 12 मदत केंद्राची स्थापना केलेली होती आणि प्रत्येक केंद्राअंतर्गत प्रवेशाबाबतचे बॅनर लावण्यात आले होते. याचा परिणाम नवी मुंबईत ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 3452 प्रवेशाची नोंदणी झालेली आहे.
दरम्यान, आरटीई दुस-या फेरीतील प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 29 मार्च 2017 ते दिनांक 08 एप्रिल 2017 अशी आहे. सदर दिनांकाची नोंद घेवून पालकांनी प्रवेशाबाबत कार्यवाही करावी, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.