शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत माहिती
मुंबई, 30 मार्च 2017/AV News Bureau:
राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थीनींचे लैगिक शोषण होत असल्याच्या घटना अशा घटना अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांतील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच विद्यार्थी, पालकांना याबाबतची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, अमर काळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
अशा प्रकारच्या घटना या गंभीर स्वरुपाच्या आहेत. आजच्याच प्रश्नोत्तरामध्ये ठाणे जिल्हयातील ज्ञानमाता या आदिवासी शाळेतील फादरकडून मुलींशी गैरवर्तन करीत असल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आलेली आहे. संबंधित फादर विरुध्द कारवाई करण्याबाबत गृह विभागाला सुचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शाळेमध्ये होणाऱ्या गैरवर्तना प्रकाराबाबत एखादया विद्यार्थीनीने अथवा तिच्या पालकांनी शासनाच्या वेबसाईटवर तक्रार करावी. या तक्रारीची तातडीने दखल घेवून दोषी व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणात तक्रारकर्त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली तालुक्यातील प्रकरणात जिल्हा परिषदेमार्फत फक्कड नारायण शिंदे या प्राथमिक शिक्षकाविरोधात शनी शिंगणापुर पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आसून त्याला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे तावडे यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.