शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांची आजपासून संघर्ष यात्रा

मुंबई, 29 मार्च 2017/AV News Bureau:

शेतकरी कर्जमाफीबाबत सर्व विरोधी पक्षांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला आजपासून सुरूवात होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे आणि 4 एप्रिल रोजी पनवेल येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एआयएमआयएम, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा काढण्यात येणार आहे. भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केला जाणारा वेळकाढूपणा आणि शेतकरी कर्जमाफीसाठी विधानसभेत संघर्ष करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन करण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचाही उद्देश असेल. या यात्रेमध्ये विरोधी पक्षांचे राज्यातील सर्व प्रमुख नेते व आमदार सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसतर्फे देण्यात आली.