महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड करणार संरक्षण भिंत, जेट्टी व पोचरस्ता तयार करण्याचे काम
मुंबई, 29 मार्च 2017/AV News Bureau:
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत गणेशघाट ते वाडेघर पर्यंत संरक्षण भिंत, जेट्टी व पोचरस्ता तयार करण्याचे काम सुरु असून हे काम एप्रिल 2017 अखेर पूर्ण करण्यात येईल असे बंदरे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला लागून असलेल्या खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासंदर्भातील प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्य जगन्नाथ शिंदे, निरंजन डावखरे आणि जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत गणेशघाट ते वाडेघरपर्यंत संरक्षण भिंत, जेटटी व पोचरस्ता तयार करण्यासाठी 450 मीटर पर्यंत काम सुरु करण्यात आले असून सदर काम येत्या एप्रिल 2017 अखेर पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी एकूण 4 कोटी 96 लाख रुपये खर्च करण्यात आला असून हे अंतर 8 किमी आहे. आतापर्यंत 300 हून अधिक मीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी ठाण्याच्या जिल्हा नियोजन समिती यांनी निधी दिला आहे. आगामी काळात युनिफाईड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्यासाठी 8 ठिकाणचा अभ्यास करण्यात येत असून यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली.