काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
चंद्रपूर,29 मार्च 2017/AV News Bureau:
राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरु झालेला हा संघर्ष कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.
सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे संघर्ष यात्रेच्या शुभारंभाच्या जाहीर सभेत बोलताना चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या तरी हे सरकार कर्जमाफी करत नाही. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, यांची योग्य वेळ येणार नाही. हे पुढच्या निवडणुकीत पुन्हा कर्जमाफीचे आश्वासन देतील, आम्हाला शेतक-यांच्या अडचणींची जाणिव होती म्हणून आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. या सरकारमध्ये संवेदना आणि निर्णयक्षमता नाही. त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहणार आहे, असे चव्हाण म्हणाले.
आम्ही पोकळ गप्पा मारत नाही आम्ही कर्जमाफी करून दाखवली. हे सरकार निर्दयी आहे, त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल,असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सरकार वाचवण्यासाठी 19 आमदारांचे निलंबन करून सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. न्याय मागणा-या शेतक-यांना मंत्रालयात मारहाण केली जात आहे. शेतक-यांसाठी कर्जमाफी मागणे हा दोष आहे का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आमदारांचे निलंबन म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पेटून उठलेले शेतकरी हे सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव जाट येथील आत्महत्या केलेले शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, शेकाप, एमआयएम या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली.