कबड्डी, खो-खो, शुटिंगबॉल खेळाचे व्यावसायिक संघ

नवी मुंबई महानगरपालिकेची अभिनव संकल्पना ; करार पध्दतीने नेमणूक

नवी मुंबई, 25 मार्च 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र शासनाच्‍या क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने क्रीडापटूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य देखील मिळावे या उद्देशाने खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले होते. या खेळाडू दत्तक घेण्याच्या योजनेची अंमलबजावणी होण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्याचे धोरण नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित केले आहे.

त्यानुसार कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे संघ तयार करण्यात येणार असून प्रथम प्राधान्य नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खेळाडूंना असणार आहे. कबड्डी संघाकरीता 15 खेळाडू, खो-खो संघाकरीता 15 खेळाडू व शुटिंगबॉल संघाकरीता 10 खेळाडूंची करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणार आहे.

या संघांमध्ये विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संघाचे प्रतिनिधीत्व केलेले कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे खेळनिहाय अनुक्रमे 10, 10 व 06 खेळाडू आणि जिल्हास्तरावरील नवोदित अनुक्रमे 05, 05 व 04 अशा प्रकारे खेळाडू निवडण्यात येतील.

या संघामध्ये निवड होणा-या खेळाडूंची 11 महिने करार पध्दतीने मासिक 15000/- इतक्या मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडूंना सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा व आवश्यक क्रीडा साहित्य महापालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल. देशांतर्गत होणा-या सर्व अधिकृत स्पर्धांमध्ये खेळाडूंना सहभागी होता येईल. यासाठी पात्र व इच्छुक खेळाडूंनी 25 एप्रिल 2017 पर्यंत आपले लेखी अर्ज सादर करावयाचे असून महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.