उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विधानसभेत माहिती
मुंबई,24 मार्च 2017 /AV News Bureau:
राज्यभरात औद्योगिकीकरणासाठी देण्यात आलेले मात्र विनावापर असलेले दोन हजार भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांचे पुनर्वाटपाची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत दिली.
सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी वितरीत केलेले भूखंड विनावापर पडून असल्याबाबत सदस्य सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात 2651 भूखंडांपैकी 2495 भूखंडांचे औद्योगिक वापरासाठी वितरण करण्यात आले. मात्र यातील सुमारे 110 भूखंड विनावापर पडल्याचे आढळून आले. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात 65 भूखंड ताब्यात घेण्यात आले आहे. या जिल्ह्यातील लघु उद्योजकांना उद्योग संजीवनी योजनेचा लाभ देऊन एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये 154 पैकी 44 उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला असून उर्वरित 110 जणांकडून भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. राज्यभरात विनावापर पडलेले भूखंडांची संख्या दोन हजार एवढी असून ते ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वाटपाची प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर जे उद्योग सुरु करण्याचे हमीपत्र देतील त्यांना हे भूखंड वितरीत केले जातील, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.