मुंबई, 24 मार्च 2017/AV News Bureau:
सामूहिक रजेचे हत्यार उगारून काम बंद करणाऱ्या डॉक्टरांचा संप सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवघेणा ठरला आहे. डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाच्या काळात राज्यभरात तब्बल 377 रुग्ण दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिका आणि सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आज याबाबतची माहिती देण्यात आली.
डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करून राज्यभरातील रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा घेत काम बंद आंदोलन केले. या डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांचे अतोनात हाल झाले. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे संतप्त झालेल्या उच्च न्यायालयानेदेखील मारहाणीची भिती वाटत असेल तर तातडीने राजिनामा द्या, असे फटकारले होते. मात्र डॉक्टरांनी उच्च न्यायालयाचेदेखील ऐकले नाही आणि आपला संप सुरूच ठेवला.
दरम्यान, डॉक्टरांच्या या काम बंद आंदोलनाचा सर्वात मोठा फटका तातडीने उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना बसला आहे. मुंबईसह राज्यभरातील रुग्णालयांमध्ये तब्बल 377 रुग्ण दगावले आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये 135 जणांचा मृत्यू झाला. यात केईएममध्ये 53, नायरमध्ये 34 तर सायन रुग्णालयात 48 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या वकीलांनी न्यायालयात दिली.
याशिवाय सेंट जॉर्जमध्ये 8, जीटीमध्ये 5, कामामध्ये 1 आणि जेजे रुग्णालात 32 रुग्णांचा मृत्यु झाल्याचे कळते.
याशिवाय राज्यातील विविध भागांमधील रुग्णालयांमध्ये दगावलेल्या रुग्णांची संख्याही 200 च्या आसपास असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, मार्डने संप मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे. तसेच उद्या सकाळी 8 वाजल्यापासून कामावर रूजू होणार असल्याचेही सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भरला दम
लोकांच्या पैशावर सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. मात्र हेच डॉक्टर नंतर याच जनतेला मरणाच्या दारात सोडणार असतील, तर जराही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक डॉक्टरांना भरला.