मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुंबई, 24 मार्च 2017/AV News Bureau:
विधानसभा सदस्यांचे निलंबन हे शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून नाही तर सभागृहात अशोभनीय वर्तन केल्याबद्दल तसेच राज्याचा अर्थसंकल्प जाळल्याबद्दल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मात्र विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार घालण्याच्या निर्णय योग्य नसल्याचेही सांगत त्याबाबाबत नापसंती व्यक्त केली.
राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षनेते आणि सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेतील आपल्या निवेदनादरम्यान केले. अर्थसंकल्प हा सर्वात महत्वाचा विषय आहे. जनतेच्या आशा आकांक्षाचे ते प्रतिक आहे. अर्थमंत्री जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प मांडत होते, काही सदस्य हास्य विनोद थट्टा मस्करी करत होते. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत नारेबाजी समजू शकतो. पण जे अशोभनीय वर्तन ते सभागृहात करत होते ते चित्रफितीत दिसत आहे. त्याहीपुढे जात राज्याच्या सर्व योजना ज्यात प्रतिबिंबीत असतात तो अर्थसंकल्पही जाळण्यात आला. संवैधानिक कागदपत्रांचा हा अवमान करणे आहे. तसेच सभागृहाचाही अवमान करण्यासारखे आहे. त्यासाठीच सदस्यांच्या निलंबनासारखा कठोर निर्णय घ्यावा लागला,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.