सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती
मुंबई, 23 मार्च 2017/AV News Bureau:
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्यात भेसळ आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत दिली.
डॉ. बालाजी किणीकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी आढळून आली. त्यामुळे सभागृहात वसतिगृहांना होणाऱ्या पदार्थ व अन्नधान्यांच्या पुरवठ्यावर चर्चा झाली.
राज्यभरातील विविध वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून अशा स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत. वसतिगृहांना अन्नधान्याचा पुरवठा करताना त्यात भेसळ आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांवर ॲट्रॉसिटीनुसार कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, महिला बचत गटांना या वसतिगृहांना आहारपुरवठा करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.