आयुक्त मुढेंची कारवाई, नगरसेवकांचा विरोध
नवी मुंबई,22 मार्च 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिकेत ठोक मानधनावर काम करणा-या ८०० कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय आज महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. मात्र आयुक्तांच्या या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला.
नवी मुंबई महानगरपालिकेत काही वर्षांपूर्वी करण्यात आलेली ठोक मानधनावरील कर्मचार्यांची भरती चुकीची करण्यात आली आहे. त्यामुळे ठोक मानधनावर काम करणा-या ८०० कर्मचा-यांना आपल्या नोक-या गमवाव्या लागणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी याबाबतचे परिपत्रक काढले असून भविष्यातली कामगार भरती ही शासनाच्या नियमांना धरून आऊंटसोर्सिंग च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मनपात कर्मचारी भरती करताना शासनाच्या नियमानुसार जाहिरात देवून, परिक्षा आणि मुलाखती मधून कर्मचा-यांची भरती करणे अपेक्षित होते. मात्र ही भरती नियमबाह्य झाली असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. भविष्यातली कर्मचारी भरती ही नियमानुसार पात्र संस्थेकडून आऊटसोर्सिंग व्दारे करण्यात येणार आहे. यामध्ये पदानुसार शिक्षणाची अट असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले.
आयुक्तांच्या या निर्णयाला सर्व पक्षीय नगरसेवकांनी सभागृहात विरोध करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सद्या काम करीत असलेले कर्मचारी हे अनुभवी असल्याने आणि बहुसंख्य प्रकल्पगस्त असल्याने त्यांना कामावरून काढून टाकणे चुकीचे असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.