निवासी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने फटकारले
मुंबई, 21 मार्च 2017/AV News Bureau:
निवासी डॉक्टरांना सुरक्षेची एवढीच भिती वाटत असेल तर त्यांनी नोकरी सोडावी अशा शब्दांत उच्च न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना चांगलेच फटकारले आहे. डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणांच्या निषेर्धात राज्यभरातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये न्यायालयाने डॉक्टरांचे हे वर्तन म्हणजे डॉक्टरी पेशाला काळीमा असल्याचे म्हटले आहे. तसेच रूग्णालय तुमच्या जागी दुस-याची नेमणीक करेल असेही म्हटले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने मार्डला प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे, मात्र तोपर्यंत सर्व डॉक्टरांना कामावर रूजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.