मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 20 : सागरमाला प्रकल्पांतर्गत करण्यात येणारी कामे तातडीने सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सागरमाला प्रकल्पाच्या राज्य समन्वय समितीची पहिली बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली.
सागरमाला प्रकल्पाअंतर्गत रोरो सेवा सुरू करण्यासाठी तवसाल, जयगड, दाभोळ, धोपवे, वेसवी, बागमांडला, अगरदांडा व दिघी येथे जेट्टी उभारण्यासाठी सुमारे 43.75 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प-
- नारंगी (विरार) ते खारवाडेश्वरी, पालघर (67 कोटी),
- भाईंदर ते वसई (89 कोटी),
- मारवे ते मनोरी (79 कोटी),
- मांडवा येथील फेरी जेट्टी (58 कोटी),
- मालवण येथील पॅसेंजर जेट्टी (23 कोटी) हे प्रकल्प मंजूर झाले आहेत.
याशिवाय मुंबईतील फेरी जेट्टी ते धरमतर दरम्यान आणि कारंजा (उरण) ते रेवास (ता. अलिबाग) दरम्यान रोरो सेवा सुरू करणे, २३ जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम, ४६ नेव्हिगेशन चॅनल तयार करणे व 35 पॅसेंजर जेट्टीसाठी ड्रेजिंग तयार करणे आदी कामेही प्रस्तावित करण्यात येणार आहेत.
- सागरी आर्थिक विकास क्षेत्र
भविष्यात या प्रकल्पांतर्गत राज्यात सागरी आर्थिक विकास क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. यामध्ये उत्तर कोकण (मुंबई, ठाणे, रायगड) व दक्षिण कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) असे दोन विभाग करण्यात येणार आहेत. यामध्ये क्रूझ पर्यटन व मुंबई गोवा फेरी सेवेसाठी पॅसेंजर टर्मिनल तयार करणे तसेच या टर्मिनलला जोडले जाणारे रस्त्यांचे जाळे निर्माण करणे आणि सागरी किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.