रवींद्र चव्हाण भाजपचे निवडणूक प्रभारी

पनवेल, 19 मार्च  2017/AV News Bureau:

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री ना रवींद्र चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

पनवेल महानगरपालिका निवडणुकीची तयारी भाजपने जोरदार केलेली आहे. केंद्रात, राज्यात तसेच राज्यातील ग्रामीण भागातही भाजपने चांगलीच घोडदौड केली आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक जाहीर झाली आहे.

महापालिका स्थापन केली असल्यामुळे तेथे प्रथम महापौरसुद्धा भाजपचाच बसवण्याचा संकल्प भाजपने नुकत्याच कळंबोली येथे झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात केलेला आहे. या विजयी संकल्प मेळाव्यात रवींद्र चव्हाण हजर होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.