कर्नाळा अभयारण्य, भूसंपादन, अतिक्रमणांमुळे काम रखडल्याचे एनएचएआयचे म्हणणे
मुंबई, 19 मार्च 2017/AV News Bureau:
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यान 84 कि.मी. लांबीच्या चौपदरीकरणाचे काम कर्नाळा अभयारण्य, भूसंपादन, मीठागर तसेच सरकारी जागेवरील अतिक्रमणामुळे एप्रिल 2014 या निर्धारीत वेळेत पूर्ण झालेले नाही. अद्यापर्यंत 46 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे मार्च 2018 पर्यंत पूर्ण होणार असून चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबई –गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दल जयंत पाटील, नारायण राणे, रविंद्र फाटक आदी सदस्यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई-गोवा या 475.21 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पैकी पनवेल ते इंदापूर या 84 कि.मी. च्या चौपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खासगीकरणातून करून घेत आहे. या कामाची किंतम 942.67 कोटी इतकी असून ते एप्रिल 2014 पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. मात्र कर्नाळा पक्षी अभयारण्य व संवेदनशील क्षेत्र (20 कि.मी. लांब) आणि काराव येथील भूसंपादन, वडखळ परिसरताली मिठागराची जागा केंद्राकडून हस्तांतरीत होणे त्याचप्रमाणे नागोठणे, कोलेटी भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे आणि काही आर्थिक बाबींमुळे चौपदरीकरणाच्या कामाला विलंब झाला आहे. मात्र आता 46 टक्के काम झाले असून उर्वरित काम एप्रिल 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एनएचएआयने कळविल्याचे पाटील यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.