मुंबई, 17 मार्च 2017/AV News Bureau:
स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या वक्तव्यामुळे कायदेमंडळाचा हक्कभंग झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधानसभेत त्यांच्याविरूद्ध हक्कभंगाची सूचना दिली.
भट्टाचार्य यांची विधाने घटनेच्या चौकटीबाहेरील व कायदेमंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारी आहेत. यासंदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आम्ही काल केली होती. परंतु अद्याप त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यामुळेच आपण हक्कभंगाची सूचना दिली आहे.
अरूंधती भट्टाचार्य या ‘पॉलिसी मेकर’ नसल्याने शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही . तो कायदेमंडळाचा अधिकार आहे. भट्टाचार्य यांनी केलेली विधाने घटनेच्या चौकटीबाहेरील व कायदेमंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारी आहेत, असेही विधानसभा विरोधी पक्शनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.