नवी दिल्ली, 16 मार्च 2017:
अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नई रोशनी कार्यक्रमाअंतर्गत चालू आर्थिक वर्षात 31 जानेवारी 2017 पर्यंत 69 हजार 150 महिलांना 14.13 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन महिलांना वित्त सहाय्य दिले जाते.
2015-16 या वर्षात 58 हजार 725 महिलांना 14.81 कोटी रुपये, तर 2014-15 या वर्षात 71 हजार 75 महिलांना 13.78 कोटी रुपयांचे वित्त सहाय्य प्रदान करण्यात आले. महिलांना शासकीय आणि इतर यंत्रणांसोबत संवाद साधण्याच्या दृष्टीने माहिती, तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रदान करुन त्यांना आत्मविश्वास वाढेल, हा या योजनेचा उद्देश आहे.
मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे गुणवान, अल्पसंख्याक मुलींना बेगम हजरत महल राष्ट्रीय छात्र वृत्ती दिली जाते. 2015-16 या वर्षात 48 हजार, तर 2014-15 या वर्षात 45 हजार 426 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला. अल्पसंख्याक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.