मुंबई उपनगरे, ठाणे, रायगडमध्ये खारफुटी तोडीची सर्वाधिक प्रकरणे
स्वप्ना हरळकर /AV News
नवी मुंबई, 16 मार्च 2017 :
सागरी किनारपट्टीची धूप थांबविण्यासाठी आणि माश्यांना प्रजनन काळात अंडी घालण्यासाठी अतिशय महत्वाची असणारी खारफुटी(कांदळवने) मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ लागली आहेत. पर्यावरणीयदृषट्या संवेदनशील मानल्या जाणा-या कोकण विभागातही खारफुटीची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह सात जिल्ह्यांमध्ये खारफुटी तोडल्याप्रकरणी वर्षभरात सुमारे 512 तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई उपनगरे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनांची बेसुमार तोड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांचा कोकण महसूल विभागाअंतर्गत समावेश होतो. या सर्व जिल्ह्यांना सागरी तसेच खाडी किनारपट्टी लाभली आहे. त्यामध्ये अनेक दुर्मिळ खारफुटीच्या प्रजाती आहेत. मात्र खारफुटीची तोड झाल्यामुळे किनारी भागातील शेतजमीन नापीक होऊ लागली आहे. समुद्राचे पाणी शेतातल्या खाचरांमध्ये शिरून जमीनीचा पोत कमी करत आहे. कांदळवने तोडण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कोकण विभागाअंतर्गत येणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात शहरीकरण वाढू लागले आहे. त्याचा परिणाम वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जमीन कमी पडत असल्यामुळे कांदळवने उध्वस्त करून मातीचे भराव टाकण्याचा सपाटाच बांधकाम व्यावसायिकांनी लावला आहे. यामुळे निसर्गाने तयार केलेली हे हिरवे सुरक्षा कवच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या वर्षभरात 500 च्यावर खारफुटी तोडीच्या दाखल झालेल्या तक्रारी :
- मुंबई शहरात 29 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 24 तक्रारींवर सुनावणी करून निकाली काढण्यात आल्या. तर 5 तक्रारींवर अद्याप कार्यवाही सुरू आहे.
- मुंबई उपनगरात 211 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 169 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून 42 तक्रारींचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
- ठाणे जिल्ह्यात 174 खारफुटी तोडीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 113 प्रकरणांवर सुनावणी होवून निकाली काढण्यात आली तर अद्याप 61 प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
- पालघर जिल्ह्यात 21 तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 13 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून 8 प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.
- रायगड जिल्ह्यात 64 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 48 तक्रारींवर सुनावणी घेवून त्या निकाली काढण्यात आल्या. तर अद्याप 16 प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यात 5 तक्रारी दाखल झाल्या असून सर्व प्रकरणांमध्ये सुनावणी घेवून त्या निकाली काढण्यात आल्या.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तक्रारींपैकी 2 निकाली काढल्या तर 6 प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, कोकण विभागाअंतर्गत कांदळवनांची होणाऱ्या कत्तलीची कोकण विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
————————————————————————————————————————————————————————————————————