पणजी, 16 मार्च 2017/AV News Bureau:
मित्र पक्षांच्या मदतीने गोव्यात सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमत्री मनोहर पर्रिकर यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत पर्रिकर यांनी 22 विरुद्ध 16 अशा फरकाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विशेष म्हणजे काँग्रेस नेते विश्वजित राणे यांनी सभात्याग केल्यामुळे काँग्रेसचे एक मत कमी पडले.
गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला 17 जागा मिळूनही इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करता आलेले नाही. मात्र राज्यापालांनी जेव्हा पर्रिकर यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले, तेव्हा काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसची विनंती फेटाळत पर्रिकर सरकारचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार पर्रिकर यांनी आज गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध केले. मतदानाच्यावेळी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड ब्लॉक आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची सदस्य संख्या 22इतकी झाली. तर काँग्रेसचे नेते विश्वजित राणे यांनी सभात्याग केल्यामुळे काँग्रेसच्या पारड्यात 16 मते पडली.
दरम्यान, विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्षांना मंतीपदे मिळणार आहेत.