बेगम परवीन सुलताना यांना पं.भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार

 जळगाव येथे उद्या पुरस्कार वितरण सोहळा

 मुंबई, 16मार्च 2017/AV News Bureau:

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार- २०१६’ हा ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उद्या, १७ मार्च रोजी जळगाव येथे एका समारंभात परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात येणार आहे.  ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी गान सरस्वती किशोरी आमोणकर, संगीत मार्तंड पंडित जसराज, गान तपस्विनी प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक पंडित रामनारायण आदी ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

हा पुरस्कार सोहळा उद्या शुक्रवार, १७ मार्च रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा बाल गंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव येथे सायंकाळी ६.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.

  • 19 मार्चपर्यंत संगीत महोत्स

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पं.भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या शास्त्रीय संगीत महोत्सवात १७ मार्च रोजी गायिका प्रीती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर,सतारवादक समीप कुलकर्णी आपली कला सादर करतील.  तर १८ मार्च रोजी गायक देबबर्णा कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोद वादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना यांच्या सुरेल गायकीचा आनंदही रसिकांना घेता येईल. १९ मार्च रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरी वादक विवेक सोनार आपली कला सादर करणार आहेत.