86 पं.स. मध्ये सभापती, 92 ठिकाणी उपसभापती
भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांची माहिती
मुंबई, 15 मार्च 2017 /AV News Bureau:
राज्यात पंचायत समिती सभापती – उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पहिला नंबर पटकावला असून सर्वाधिक ८६ पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे सभापती निवडून आले आहेत तर ९२ ठिकाणी भाजपाचे उपसभापती निवडून आले आहेत. भाजपाच्या सहयोगी पक्ष – आघाड्यांचा विचार करता भाजपा व मित्रांच्या सभापतींची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे,असे भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी सांगितले.
भाजपाला रोखण्यासाठी काही पक्षांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही भाजपाने पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत पहिला क्रमांक राखला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा सर्व विभागांमध्ये पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे कार्यकर्ते निवडून आले. राज्यात पंचवीस जिल्ह्यांपैकी एकोणीस जिल्ह्यांमध्ये भाजपाने किमान एक पंचायत समिती सभापतीपद जिंकले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोन, जळगाव जिल्ह्यात दहा, वर्धा जिल्ह्यात आठपैकी आठ, चंद्रपूर जिल्ह्यात पंधरापैकी अकरा, जालना जिल्ह्यात आठपैकी चार, औरंगाबाद जिल्ह्यात नऊपैकी पाच, लातूर जिल्ह्यात दहापैकी सात, सोलापूरमध्ये तीन, कोल्हापूरमध्ये तीन तर सांगली जिल्ह्यात दहापैकी पाच पंचायत समित्यांचे सभापती भाजपाने जिंकल्याचे भंडारी यांनी सांगितले.
राज्यामध्ये गेल्या महिन्यात २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या व त्यांचा निकाल २३ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. भाजपाने जिल्हा परिषदांमध्ये व पंचायत समित्यांमध्ये अन्य प्रमुख राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक जागा जिंकून प्रथम स्थान मिळवले होते. पंचायत समिती सदस्यांच्या एकूण २९९० जागांपैकी भाजपाने ८३१ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस (५९१), राष्ट्रवादी (६७४) आणि शिवसेना (५८१) हे अन्य पक्ष भाजपाच्या तुलनेत सदस्य संख्येच्या बाबतीत मागे पडले होते. त्याचेच प्रतिबिंब मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत पडले.जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतही भाजपा बाजी मारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.