पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी

कॉंग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई, 14 मार्च 2017/AV News Bureau:

गोवा विधानसभेसाठी मनोहर पर्रिकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला स्थगिती मिळावी यासाठी कॉंग्रेसने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे मनोहर पर्रिकर आज संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  त्यांनी १६ तारखेला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

गोवा विधानसभेत सर्वाधिक 17 जागा मिळवून काँग्रेस अव्वल स्थानावर आहे. मात्र 24 तासात नेता निवडीबाबत निर्णय झाला नाही. तर दुसरीकडे भाजपने इतर पक्षांशी मोट बांधत सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपने राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केला होता.राज्यपालांनीही पर्रिकर यांना सत्ता स्थापनेसाठी अनुकूलता दर्शविली होती. यावर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या मागणीवर आज न्यायालयाने निकाल दिला आहे.

तुमच्याकडे जास्त आमदार होते, तर तुम्ही आधीच सरकार स्थापनेचा दावा का केला नाहीत असे विचारत तुमहाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, त्याबाबतही काही नमूद केले नसल्याचे न्यायालयाने विचारले. त्यावर काँग्रेसतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.