उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याची रामदास कदम यांची माहिती
मुंबई, 13 मार्च 2017/AV News Bureau:
जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिले आहेत. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याविषयी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ठाकरे यांच्या या आदेशामुळे भाजप आणि शिवसेनेमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून बुधवारपासून पुन्हा सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्दयावर शिवसेना आक्रमक झाली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यानही शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला होता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने त्याच मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान,या प्रश्नावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी भाजपचे मंत्री कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.