पणजी, 13 मार्च 2017/AV News Bureau:
भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड पाठोपाठ गोव्यातही सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रात संरक्षण मंत्री असणारे मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले असून ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी राज्यपालांची भेट घेवून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. सत्ता स्थापनेनंतर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
गोवा विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत 17 जागा मिळवून काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना अद्याप 4 जागा हव्या आहेत. मात्र नेता निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नसताना दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपने स्वतःच्या 13 जागा आणि इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे. शिवाय दोन महत्वाची मंत्रीपदेही या पक्षाला मिळणार असल्याचे समजते. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
गोवा विधानसभा पक्षीय बलाबल
- काँग्रेस -17
- भाजप -13
- महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -3
- गोवा फॉरवर्ड पक्ष -3
- अपक्ष -3
- राष्ट्रवादी काँग्रेस -1
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मनोहर पर्रिकर हे केंद्री संरक्षणमंत्रीपदाचा राजिनामा देतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.