आगरी कोळी फाउंडेशनतर्फे १४ मार्चपासून उपोषण
नवी मुंबई,१२ मार्च २०१७ /AV News Bureau:
नवी मुंबईतील गावठाणे आणि विस्तारित गावठाणांतील घरांचा आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा तिढा गेल्या काही वर्षांपासून कायम आहे. शहरीकरण करताना सिडको आणि महापालिकेने प्रकल्पग्रस्त आणि गावठाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीने आगरी कोळी फाउंडेशनच्या माध्यमातून लढा उभारला आहे. येत्या १४ मार्चपासून आपल्या मागण्यांसाठी फाउंडेशच्या वतीने उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
राजकीय हित न बघता या लढ्यात साऱ्यांनी सामील व्हा, असे आवाहन आगरी कोळी फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी केले आहे. हा लढा राजकीय किंवा संघटनेचा नसून तो संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचा आहे. हा लढा दोन टप्यांत पार पडणार आहे त्यातला पहिला टप्पा अखंडपणे उपोषण करणा-यांचा असणार आहे. त्यामध्ये ५० ते१०० उपोषणकर्ते असणार आहेत. या व्यासपीठावर ९५ गावांतील सदस्य असणार आहेत.
मूळ गावठाण व विस्तारित गावठाण किंवा गावालगतच्या जमिनीचे सर्वेक्षण करणे, शेतक-यांना मालकीतत्वावर त्यांच्या व्याप्त क्षेत्राचा अधिकार सनद स्वरूपात देणे, गावठाण किंवा गावालगतच्या घरांना संरक्षण देऊन नियमित करणे. जी बांधकामे नियमीत होऊ शकत नाही, अशा बांधकामांना अभय देऊन त्यांना वाढीव चटई क्षेत्रासह पुर्नविकासाचा पर्याय देणे. सिडकोने प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के विकसित भूखंड वाटपाच्या योजनेअंतर्गत त्यातील ३.७५ टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक सेवा सुविधांसाठी राखीव ठेवले होते त्याचे वाटप करावे, यांसारख्या मागण्या आगरी कोळी फाउंडेशनतर्फे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनेही पाठिंबा दिला असल्याचे नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे कळविले आहे.