नवी दिल्ली, 10 मार्च 2017:
देशात शोभिवंत मत्स्योत्पादनासाठी 61 कोटी 89 लाख रुपये खर्चाचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रासह आसाम, पश्चिम बंगाल, ओदिशा, तामिळनाडू, कर्नाटक केरळ आणि गुजरात या आठ राज्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ राज्यांच्या मत्स्य विभागांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
- शोभिवंत मत्स्योत्पादनाला वाव
शोभिवंत मत्स्योत्पादन हे मत्स्योत्पादन क्षेत्राचे उपक्षेत्र आहे. यात गोड्या आणि खाऱ्या पाण्यातल्या रंगीबेरंगी माशांची पैदास केली जाते. अन्न आणि पोषण सुरक्षेत या माशांचा वाटा नसतो. मात्र या क्षेत्रातून ग्रामीण आणि निमशहरी लोकसंख्येला उपजीविका मिळू शकते. विशेषत: महिला आणि बेरोजगार युवक अंशकालीन उपक्रम म्हणून यातून उत्पन्न मिळवू शकतात. या क्षेत्रात कमी उत्पादन खर्चातून अल्प कालावधीत चांगला नफा मिळू शकतो. देशात सागरी शोभिवंत माशांच्या 400 तर गोड्या पाण्यातल्या 375 प्रजाती आढळतात.