गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर
मुंबई, 7 मार्च 2017/AV News Bureau:
मुंबई शहर व उपनगरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर विकासकांनी अतिरिक्त चटई क्षेत्रफळ सदनिका स्वरूपात म्हाडाला दिल्या नसल्याच्या तक्रारींबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास सुरु असून, दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले.
शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विधानसभा सदस्य ॲड. आशिष शेलार , नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात ३३ प्रकरणामंध्ये म्हाडास जमीन प्राप्त झाली नाही. या प्रकरणांतील विक्रीयुक्त बांधकाम अद्याप सुरू झाले नाही अशी २ प्रकरणे, गुन्हा नोंदविण्यापूर्वी मंडळास अतिरिक्त बांधकाम क्षेत्र सुपुर्द केले असे एक प्रकरण व न्यायप्रविष्ट असलेले एक प्रकरण वगळता इतर २९ प्रकरणांमध्ये म्हाडामार्फत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करण्यात येत आहे. यामध्ये २६ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल करण्यात आले आहेत. म्हाडातर्फे सदर विकासकांच्या मालमत्ता जप्ती करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून १४ विकासकांनी एकूण ६४०९.२२ चौ.मी. अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ मंडळास सुपुर्द केले आहे.