जलयुक्त शिवारने माफिया निर्माण केले

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

मुंबई, 7 मार्च 2017/AV News Bureau:

महात्मा फुले जलभूमि अभियानाचे नाव बदलून सरकारने जलयुक्त शिवार केले. नाव बदलताना सरकारने या योजनेचे निकषही बदलले. त्यामुळे या योजनेतील लोकसहभाग संपुष्टात येऊन ठेकेदारांना मोकळे कुरण मिळाले. आज ही पूर्णतः कंत्राटदारांच्या हातातील योजना झाली असून, राज्यात वाळू माफियांप्रमाणे जलसंधारण क्षेत्रातील ठेकेदारांची नवी माफिया जमात निर्माण झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी केला.

विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. या योजनेचा सरकार कितीही गाजावाजा करीत असले तरी प्रत्यक्षात ही योजना फसवी ठरली आहे. या योजनेमध्ये सरपंचापासून आमदारापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला विचारात घेतले जात नाही. साहाजिकच कंत्राटदारांनी मनाला वाट्टेल त्याप्रमाणे कामे केली. त्यामध्ये भ्रष्टाचार केला. म्हणूनच गतवर्षी पावसाळ्यात असंख्य बंधारे वाहून गेले, असा आरोप विखे पाटील यांनी केला.