लाचप्रकरणी अधिकारी, तलाठ्याविरोधात गुन्हा

नवी मुंबई,6 मार्च 2017/AV News Bureau:

जमिनीच्या फेरफारावर नाव नोंदणी करून त्या उताऱ्याची प्रत देण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पालघर येथील मंडळ अधिकारी आणि तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गुन्हा दाखल केला.

जमिनीच्या फेरफारावर नावाची नोंद करून त्या उताऱ्याची प्रत देण्यासाठी सजा भिलोशी, पालघर येथील तलाठी मंगेश काशिनाथ दुतारे (40) यांनी स्वतःसाठी आणि पालघर, कुडूस येथील मंडळ अधिकारी हरीश्चंद्र भरसट यांच्यासाठी फिर्यादीकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या आधारे सापळा रचून तलाठी मंगेश काशिनाथ दुतारे यांना लाचेची 5 हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तसेच मंडळ अधिकारी हरीश्चंद्र रामा भरसट यांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक दिपक दळवी यांनी दिली.