नवी मुंबईत आज कुस्तीचा फड रंगणार

नवी मुंबई ,4 मार्च 2017 /AV News Bureau:

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालिम संघाच्या सहकार्याने नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  आज आणि उद्या ही स्पर्धा रा.फ.नाईक विद्यालय, से.8, कोपरखैरणे येथे रंगणार आहे.

ही स्पर्धा पुरूष व महिला अशा दोन्ही विभागात होणार आहे. पुरूष विभागात राज्यस्तरीय 3 वजनी गट, ठाणे व रायगड जिल्ह्याकरीता 2 वजनी गट तसेच नवी मुंबई परिसर मर्यादीत 2 वजनी गट त्याचप्रमाणे महिलांकरीता 1 विशेष वजनी गट अशा एकूण 8 वजनी गटांत स्पर्धा खेळवली जाणार आहे. सर्व वजनी गट मिळून प्रथम चार क्रमांकांना चषक, प्रशस्तिपत्र व एकूण 3 लक्ष 40 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.