ठाणे, 4 मार्च 2017/AV News Bureau:
चलनातून रद्द करण्यात आलेल्या 97 लाखांच्या नोटा ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
खारेगाव, ठाणे रेतीबंदर रोड येथील अमित गार्डन हॉटेल जवळ एक व्यक्ती चलनातून रद्द केलेल्या नोटा घेवून येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी गार्डन हॉटेल परिसरात एका संशयास्पद वाटणाऱ्या वॅगन आर गाडीला थांबवून झडती घेण्यात आली. तेव्हा त्या गाडीच्या पाठीमागच्या सीटवर असलेल्या बॅगेत 1000 रुपये दराच्या 5 हजार 231 नोटा आणि 500 रुपये दराच्या 8 हजार 919 नोटा अशा एकूण 96 लाख 90 हजार 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. याप्रकरणी गाडीचा चालक संजय चन्ने याला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.