पनवेल,2 मार्च 2017/AV News Bureau:
भारतीय जनता पार्टी पनवेल अनुसूचित जाती मोर्चा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी मार्केट यार्ड येथे झाला. या बैठकीमध्ये आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख,शहराध्यक्ष जयंत पगडे,जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव,जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष अरुण सोळंकी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड,अनिल साबणे,किशोर चौतमल आदी उपस्थित होते.
काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी आंबेडकरी जनतेला केवळ झुलवत ठेवले. त्यामुळेच काँग्रेस हे जळते घर झालेले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आहे;राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाट आहे आणि येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाट आहे असे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार यावेळी म्हणाले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारताची मान जगामध्ये उंचावली आहे. त्याच बाबासाहेबांच्या लेकी पनवेल महानगरपालिकेचे प्रथम महापौरपद स्वीकारणार आहेत. या नगरीला चांगले वलय प्राप्त करून देऊन भाजपने चांगला महापौर दिला असा नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी लागणारे बहुमत मिळविण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन रामशेठ ठाकूर यांनी केले.