महापौरपदासाठी शिवसेनेची बाजू वरचढ ?

मुंबई, 2 मार्च 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या 8 मार्च रोजी होणाऱ्या महापौर पदाची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

युती तोडून शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. मुंबईत शिवसेनेचे 89 नगरसेवक आणि भाजपाचे 83 नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठता न आल्यामुळे पालिकेत सत्तेसह महापौर निवडणून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी, मनसे आदींनी शिवसेनेला झुकते माफ देण्याचे संकेत दिले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीदेखील भाजपसोबत जाणार नसल्याचे म्हटले आहे. तर मनसेच्या नेत्यांचीही अशीच काहीशी भूमिका आहे. मात्र नेमके चित्र अद्याप स्पष्ट होत नसले तरी याप्रकरणी भाजप कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना- 84

भाजप -82

काँग्रेस -31

राष्ट्रवादी काँग्रेस -9

मनसे-7

सपा- 6

एमआयएम -3

अखिल भारतीय सेना -1

अपक्ष-4